काही जणांचा निरोप घेणं जिवावर येतं...निरोपा सारखा भयाण क्षण नसेल!
हे असं का होतं समजत नाही,
व्हीटनीला मरायचं होतं का? खरच ड्रग ओव्हरडोस होता तो की लंग-डीसीज होता तो? व्यसन केल्याशिवाय कलावंत जगू शकत नाही?
आता प्रश्नांशिवाय उरलय तरी काय! ती कुठल्या भूमीतली आणि मी कुठल्या भूमीतली;तरीही तिच्याशी काही बंध आहेसा वाटतो तो तिच्या आर्त आसाच्या आवाजामूळे..तिच्या गाण्याच्या साध्यासुध्या शब्दामूळे.
कलावंताला हे गूढ नैराश्य का घेरतं? कलेचच बोट धरून त्यातून वाट काढता येते नं...चर्च मधल्या गाण्यातून तिने ती मानसिक शक्ती का नाही मिळवली मग? त्या देवाने ती वाट तिला का दाखवली नाही?
डोरीस डे, जेन फ़ोंडा, लीझ टेलर,ऑड्री हेपबर्न या सगळ्या जगल्या नाहीत? तिचा आवाज राष्ट्रीय संपत्ती आहे अस अमेरीका म्हणते...आपल्या लता, आशा यांचे आवाजही राष्ट्रीय संपत्तीच आहेत, पण हे आवाज कधी ड्रग्जच्या विळख्यात अडकले नाहीत. भावनांना विचार, आचार आणि तत्वांचा ठाम पाया होता आणि आहे म्हणून असेल कदाचित! बदलांच्या बेसुमार लाटा धडकत असतातच...त्यांना तोंड द्यायला लागते ती निधडी विचारसरणी..हलाहल पचवू शकणारी. उत्तम पाश्चात्य कलावंतांनी अंतर्मुख होणं गरजेचं आहे..पाश्चात्यच का सर्वच कलाकारांनी हे करायला नको का?